जगभरात करोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात जनतेला आवाहन केलं आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी”, असं मोहन भागवत म्हणाले. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भेदभाव विसरून एकसंघ लढा द्यावा लागेल”

आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल, असं यावेळी मोहन भागवत म्हणाले. “जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत”, असं ते म्हणाले.

“वैज्ञानिकतेचा आधार घ्या”

यावेळी मोहन भागवत यां सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल

“ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल”

“काही लोकं घाबरून अनावश्यक रुग्णालयात दाखल होतात. परिणामी खरी गरज ज्यांना असते, त्यांना बेड मिळत नाही. त्यामुळे लक्षणं जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार लागलीच पावलं उचला उपचार सुरू करा. नियमांचं पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. इतक्या वर्षांत इतक्या भयानक संकटात आपला देश अढळ राहिला. या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल. पण तो आपण जिंकू, आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्गुणांना वाढवून ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा, निराश होण्याचं कारण नाही”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी लोकांना आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat on corona second wave in india pmw
First published on: 15-05-2021 at 17:08 IST