कोणी काय खावे आणि कोणाचा पेहराव कसा असावा, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व होत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ‘कोणी काय खावे, कोणी काय परिधान करावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही. तर इतरांना ते जसे आहेत, तसे स्वीकारणे म्हणजे हिंदुत्व आहे,’ असे भागवत यांनी म्हटले. सरसंघचालकांचे हे विधान सध्याच्या परिस्थितीत अतिशय महत्त्वाचे आहे. गोमांस बाळगल्याच्या, गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन उजव्या संघटनांकडून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात असताना भागवत यांनी हे विधान केले आहे.

मोहन भागवत यांनी ५० देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी देशातील विविध घटनांवर त्यांनी भाष्य केले. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवरदेखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘सोशल मीडियावर ट्रोल करताना कमरेखाली टीका केली जाते. या कृतीचे समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत नाही,’ असे त्यांनी म्हटले. ‘संघ आणि भाजप एकमेकांशी संवाद साधतात. मात्र संघ आणि भाजपची निर्णय प्रक्रिया स्वतंत्र आहे’, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

भाजपचे सचिव राम माधव यांच्या इंडिया फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मोहन भागवत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संघाकडून चालणाऱ्या कामांची माहिती राजनैतिक अधिकाऱ्यांना दिली. यावेळी भागवत यांनी उपस्थितांना हिंदुत्वाच्या मुद्यावर संबोधित केले. ‘कोणी काय खावे, कोणी काय परिधान करावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही. एखाद्या व्यक्तीला तो जसा आहे, तसा स्वीकारणे म्हणजे हिंदुत्व आहे,’ असे त्यांनी म्हटले.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या कडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून गोवंश सुरक्षेचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे हाताळला जात आहे. गोमांस वाहतूक, गोमांस सेवन, गोमांस बाळगल्याच्या केवळ संशयावरुन उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून विशिष्ट समुदायातील लोकांवर हल्ले केले जात आहेत. या संघटनांना संघाचे समर्थन असल्याची टीका देशभरातून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भागवत यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.