संघाच्या प्रतिनिधी सभेचा ठराव; गुलाम नबी आझादांवर टीकास्त्र
समाजातील संपन्न वर्गानी आरक्षणाची मागणी करणे अयोग्य असल्याचे मत रा.स्व. संघाने व्यक्त केले असून, आरक्षणाची खरोखर गरज असलेल्या मागासवर्गीय समाजाला आरक्षणाचे फायदे प्रत्यक्षात मिळत आहेत अथवा नाही हे पडताळून पाहण्यात यावे, असे आवाहन केले आहे.
जातीवर आधारित भेदभावाकरता हिंदू समाजाचे सदस्यच जबाबदार असून, सामाजिक न्यायासाठी ही भेदभाव करणारी व्यवस्था निपटून काढण्याच्या आवश्यकतेवरही संघाने भर दिला.
समाजातील ‘संपन्न’ वर्गानी आरक्षण मागणे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत केलेल्या आरक्षणाच्या तरतुदी सामाजिक न्यायासाठी होत्या आणि आज आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले.
जोशी यांनी आरक्षणाची मागणी करणाऱ्या कुठल्याही समुदायाचा थेट उल्लेख केला नसला, तरी अलीकडेच आरक्षणासाठी हरयाणामध्ये फार मोठय़ा प्रमाणावर हिंसक आंदोलन करणाऱ्या जाट समाजाकडे त्यांचा रोख असल्याचे मानले जात आहे.
संघाच्या प्रतिनिधी सभेच्या तीन दिवस चाललेल्या बैठकीचा रविवारी समारोप झाल्यानंतर भय्याजी जोशी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

संघ शाखा वाढल्या
२०१५-१६ या वर्षांत संघाच्या देशभरातील शाखा साडेपाच हजारांनी वाढल्या आहेत. २०१२ ते २०१५ या तीन वर्षांमध्ये शाखांमध्ये १०,४१३ ने वाढ झाली होती, तर २०१५-१६ या वर्षांत ५,५२४ शाखा वाढल्या आहेत. देशभरातील ५८ हजार खेडय़ांमध्ये संघाचे अस्तित्व असून, संघाचे काम आणि स्वीकारार्हता वाढत आहे, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले.

महिलांच्या मंदिरप्रवेशावर र्निबध गैर
महिलांना मंदिरप्रवेशापासून रोखणे गैर आहे. अशा ठिकाणच्या देवस्थानांच्या व्यवस्थापनाने आपली मानसिकता बदलावी, असा सल्ला संघाने दिला आहे. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या आंदोलनांच्या पाश्र्वभूमीवर ही भूमिका महत्त्वाची आहे. मात्र निदर्शने करून नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याची सूचना केली आहे.

‘जेएनयू’तील घोषणाबाजी गंभीर
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी घोषणा देणे ही गंभीर बाब असल्याचे मत संघाने व्यक्त केले. या प्रकरणी राजकारण न होता कायद्याला आपले काम करू द्यावे, असे भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले. एखादा राजकीय पक्ष सत्तेवर आल्यावर पाकिस्तानबाबतची त्याची धोरणे कशी बदलतील, असा सवाल केला. जेएनयूप्रकरणी देशातून जी तीव्र प्रतिक्रिया उमटली ते पाहता ते स्वागतार्ह आहे. समाजजागृतीचे हे लक्षण आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी संघ व दहशतवादी संघटना आयसिसची तुलना केली होती. त्यावर संघाने टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे आझाद यांना किती ज्ञान हे समजले, त्यातून त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच उघड झाल्याचा टोलाही जोशी यांनी लगावला.