व्यंकय्या नायडू यांच्या विजयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या तीन सर्वोच्च पदावर स्वयंसेवक विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि आता नवनिर्वाचित उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू या तिघांनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. या तिन्ही नेत्यांवरचा मूळचा राजकीय संस्कार हा संघाचाच आहे. या तिघांमध्ये काही साम्यस्थळंही आढळून येतात ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे.

गरीबीतलं बालपण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात आपल्या गरीबीचा उल्लेख केला होता. नारळाच्या झावळ्या असलेल्या घरात आपण कसे राहिलो पाऊस आला की कशा अडचणी येत हे सांगताना ते भावूक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या लहानपणी चहा विकत असत आपल्या भाषणांमधून अनेकदा त्यांनी आपल्या घरातल्या बिकट परिस्थितीचा उल्लेख केला आहे. तर व्यंकय्या नायडू यांचे वडिल शेतकरी होते, त्यांच्या घरीही जेमतेमच परिस्थिती होती.

तिन्ही नेत्यांना संघाची पार्श्वभूमी
नरेंद्र मोदी हे वयाच्या १७ वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले तिथपासून पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे. २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि पुढील १३ वर्षात म्हणजेच २०१४ मध्ये देशाच्या सर्वोच्चपदी अर्थात पंतप्रधानपदी ते जाऊन बसले.

रामनाथ कोविंद हे देखील १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. दलित आणि समाजातल्या मागास घटकांसाठी त्यांनी काम केलं. तर व्यंकय्या नायडू हेही लहानपणापासून संघात आहेत. लहानपणी बऱ्याचदा ते संघाच्या कार्यालयातच झोपत. संघामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरत पुढे जात नायडू यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आता येत्या ११ तारखेला ते उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.

तिघांचे राजकीय गॉडफादर नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेले व्यंकय्या नायडू हे स्वबळावर राजकारणात आले आहेत त्यांना कोणीही राजकारणात आणलं नाही. आपल्या गुणांनी ते यशाची एक एक पायरी चढत या पदांवर जाऊन बसले आहेत. आपल्या कामामुळे आणि हुशारीमुळे राजकारणातली योग्यता या तिन्ही नेत्यांनी सिद्ध केली आहे.

९२ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. देशाच्या सर्वोच्चपदी स्वयंसेवक बसावा अशी तेव्हापासूनची संघांची इच्छा आज तीन नेत्यांच्या रूपानं पूर्ण झाली आहे.