अलिगड येथे संघाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेने आखलेला सर्वात मोठा घर वापसीचा म्हणजे धर्मातराचा कार्यक्रम आता अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. संघाशी संबंधित असलेल्या धर्म जागरण समितीने घरवापसीच्या नावाखाली आग्रा येथे केलेल्या या धर्मातरावर गेल्या आठवडय़ात संसदेत मोठी टीका झाली तरीही अजून त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी चार हजार ख्रिश्चन व एक हजार मुस्लिम अशा एकूण पाच हजार जणांची घरवापसी घडवून आणण्याचे ठरवले आहे. अलिगड येथे २५ डिसेंबरला घरवापसीचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी माहेश्वरी इंटर कॉलेज हे ठिकाण रा.स्व.संघाशी संबंधित संघटनेने निश्चित केले आहे. ज्या वस्तीत घरवापसी होणार आहे तेथील सध्या ख्रिश्चन असलेल्या पूर्वीच्या हिंदू व्यक्तीने सांगितले की, हिंदू धर्माने कधीच प्रेम दिले नाही, जर आज आपली ही अवस्था आहे तर उद्या ती कशावरून बदलणार आहे. त्यांना धमक्याही देण्यात आल्या की तुम्ही हिंदू धर्मात घरवापसी केली नाही तर तुमच्या मुलीशी कुणी लग्न करणार नाही.
आग्रा येथे पहिल्यांदा धर्मातराचा पहिला प्रकार घडतो न घडतो तोच आता अलिगड या संघटनेच्या रडारवर आहे. पण हे आताचेच प्रकार आहेत असे नाही तर सहा महिन्यांपूर्वी हरिदासपूर येथे दलित बहुल वस्तीत असेच धर्मातर करण्यात आले होते, त्या लोकांचे म्हणणे असे की, मुळात आम्ही हिंदू होतो त्यांनी आमचे शुद्धीकरण केले पण नंतर धर्म जागरण समितीने काही केले नाही. धर्मातरितांपैकी विशाल याने सांगितले की, आम्ही नवहिंदूू आहोत. आम्ही दलित आहोत हे माहीत आहे, सगळेच आम्हाला वाईट वागणूक देतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक शाखेने असा दावा केला आहे की, आम्ही अलिगडच्या आजूबाजूच्या भागात ४०००० जणांचे फेरधर्मातर म्हणजे घरवापसी केली आहे. त्यात दोन हजार मुस्लिम आहेत. हरिदासपूर येथे जे धर्मातर झाले त्यात विशाल व त्याची भावजय गीता सहभागी होते. विशालने सांगितले की, ते लोक आले व त्यांनी होम हवन करायचे आहे असे सांगितले. आम्हाला माहिती आहे की, आम्ही दलित आहोत, हिंदू हवन असा शब्द त्यांनी वापरला. समितीने सांगितले की, आम्ही तुम्हाला ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात आणत आहोत, विशाल त्यावर हसून सांगतो की, असे धर्मातर होऊच शकत नाही. गीताची मुलगी अजूनही क्रॉस लावूनच शाळेत जाते. आता खवारसी या अलिगडच्या छोटय़ा वसाहतीत २५ डिसेंबरला घरवापसीचा कार्यक्रम आहे. मेसी नावाचे एक गृहस्थ तेथे राहतात. तेथे जातपात सगळे आहे. उच्च जातीचे लोक कनिष्ठ जातीच्या मुलांना वाईट वागणूक देतात. ११ डिसेंबरला धर्मजागरण समितीचे लोक त्यांना भेटले. ते घरात नव्हते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलालाच घरात किती ख्रिश्चन आहेत हे विचारले व भागातील माहिती विचारली. त्याला काही माहिती नव्हते. हिंदू जागरण समितीचे निमंत्रक सतप्रकाश नवमान हे आमदारपुत्र असून त्यांना येथे किती जण धर्मातरित ख्रिश्चन व मुस्लिम आहेत याची माहिती आहे, त्यांची नावेच ते सांगतात असे ते म्हणतात. मेस्सी यांनी दलित हिंदू म्हणून आयुष्य घालवले पण त्यांना जातीबाहेरचे समजले गेले. आमचे शिक्षक आम्हाला मुद्दाम नापास करीत त्यामुळे जात व धर्म बदलला. हिंदू हमे इन्सान नही समझते हैं, जो धर्म प्रेम देत नाही त्याच्याविषयी अजिबात आपुलकी नाही. आम्ही तो धर्म नाकारतो असे ते म्हणतात. त्यावर काही लोकांनी मेस्सी यांनी धमकी दिली तुमच्या मुलीशी कुणी लग्न करणार नाही. त्यांना मेस्सी सांगतात, की आज माझी ही अवस्था आहे तर उद्या ती चांगली असणार आहे असे कुणी सांगितले.