पूर्वी भारतात अस्पृश्यता नव्हती. इस्लामच्या आगमनानंतर अस्पृश्यता अस्तित्वात आली, असे धक्कादायक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते कृष्णा गोपाल यांनी एका कार्यक्रमात केले. तसेच दलित ही संकल्पनाही देशाला माहिती नव्हती. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा नीतीचा तो भाग होता, असेही ते म्हणाले.

नवी दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दलित या विषयावर कृष्णा गोपाल बोलत होते. जातीविरहीत समाज हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. इस्लामच्या आगमनापूर्वी अस्पृश्यता नव्हती. इस्लामच्या आगमनानंतर अस्पृश्यतेचे उदाहरण सापडते. सिंध राज्याचा अखेरचा राजा राजा दहिर त्याच्या राण्यांसह आत्मदहन करायला जात होता. यावेळी त्यांनी सर्वप्रथम मेलेच्छा (इस्लाम) या शब्दाचा उल्लेख केला होता. पटकन आत्मदहन करायला हवे नाहीतर मेलेच्छांनी स्पर्श केला तर अपवित्र होईल, असे राजा दहिर म्हणाला होता. भारतातील हेच पहिले उदाहरण आहे. अधात्म आणि संवेदनशीलतेमुळेच इस्लाम भारतात टिकून राहिला, असे मत गोपाल यांनी व्यक्त केले.

जातीविषयींचा आदर कसा कमी होत गेला याविषयी बोलताना गोपाल म्हणाले, मौर्य ही उच्च जात होती. आज ती मागास म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये राजे असलेले पाल मागास वर्गात गेले आहेत. बुद्धाची शाक्य ही जात ओबीसीमध्ये आहे. दलित हा शब्द भारतीय समाजात अस्तित्वात नव्हता. तो ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या कटाचा भाग होता. संविधान सभेने नाकारूनही दलित शब्द बोलताना वापरला जातो. विरोधकांकडून संघाची प्रतिमा दलित विरोधी केली तयार केली जाते. मात्र संघ मागास जातींसाठी काम करीत आहे. मागास जातींविषयी संघाची भूमिका आणि विचार चुकीच्या पद्धतीने मांडण्याचे केले जात आहे, असेही गोपाल यावेळी म्हणाले.