केरळच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या विधानानंतर कारवाई; टीकेनंतर माफीनामा

केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर करणारे रा. स्व. संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांची संघातील सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान विधानाबाबत संघ परिवारासह चहुबाजूंनी जोरदार टीका झाल्यानंतर चंद्रावत यांनी ते विधान मागे घेतले आहे.

उज्जनमध्ये संघाचे सहप्रचारप्रमुख असलेले चंद्रावत यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत असल्याचे मध्य प्रदेश संघचालक प्रकाश शास्त्री यांनी स्पष्ट केले. चंद्रावत यांच्या वक्तव्याने संघाबाबत चुकीचे मत तयार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आपल्याला केरळमधून ठार मारण्याची धमकी देणारे दूरध्वनी आल्याचे आणि समाज माध्यमांवरून आपल्यावर टीका करण्यात येत असल्याचा दावा केला.

संघ स्वयंसेवकांच्या हत्या होण्याचे प्रकार घडल्याने आपण व्यथित झालो होतो आणि त्यामुळेच अशा प्रकारचे भावनिक विधान आपण केले, हे विधान आपण मागे घेत असून त्याबद्दल खेद व्यक्त करीत आहोत, असे चंद्रावत यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

माकप कार्यकर्त्यांकडून संघ स्वयंसेवकांच्या हत्या करण्यात आल्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी इनाम जाहीर केले. संघ परिवार, माकप आणि काँग्रेसने त्याचा तीव्र निषेध केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे संघ स्वयंसेवकांच्या हत्येला जबाबदार आहेत, त्यामुळे विजयन यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर जो आपल्याकडे आणून देईल त्याला एक कोटी रुपयांचे इनाम देण्यात येईल, असे विधान चंद्रावत यांनी केले होते.

केरळमध्ये संघ कार्यालयावर हल्ला; ४ स्वयंसेवक जखमी

कोझिकोडे : केरळच्या कोझिकोडे येथील नदापुरम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात (आरएसएस) बॉम्बस्फोट करण्यात आला असून, यामध्ये चार संघ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. दोन अज्ञात बाइकस्वारांनी हा हल्ला केला. ते अचानक संघ कार्यालयाजवळ आले आणि बॉम्ब फेकून पसार झाले, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद केल्यास एक कोटीचे इनाम देण्यात येईल, असे विधान संघ स्वयंसेवकाने केल्यानंतरच्या काही तासांनंतरच हा हल्ला करण्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये येथे संघ कार्यालयांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

माकपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

पल्लकड : केरळमध्ये राजकीय पक्षांमध्ये हिंसा दिवसेंदिवस वाढत असून, संघ कार्यालयात झालेल्या हल्ल्यानंतर आता माकप पक्षाची युवा शाखा असलेल्या ‘डेमोक्रॅटिक यूथ फ्रन्ट ऑफ इंडियाच्या’ (डीवायएफआय) दोन कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. संघ कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर रात्री सहा जण दुचाकीवरून येत घरात घुसले आणि माकपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या वेळी धारदार शस्त्रास्त्रे आणि दगडांचा वापर करण्यात आला. या दोघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.