इंदिरा गांधींनी देवरस यांना भेट नाकारली; ‘आयबी’च्या माजी संचालकांचा दावा
देशात आणीबाणी लादण्यात आली असताना आखण्यात आलेल्या काही उपाययोजनांना तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पाठिंबा जाहीर केला होता आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र इंदिरा गांधी यांनी भेट दिली नाही, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेचे (आयबी) माजी संचालक टी. व्ही. राजेश्वर यांच्या पुस्तकातून समोर आली आहे.
टी. व्ही. राजेश्वर हे १९८० आणि १९९० च्या दशकांत अनेक राज्यांचे राज्यपाल होते. गुप्तचर यंत्रणेतील आपल्या दीर्घकालीन अनुभवांचे त्यांनी पुस्तकात कथन केले आहे. १९८० पूर्वी शस्त्रास्त्र खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची आणि लाच देण्यात आल्याची प्रकरणे नमूद करण्यात आली आहेत. मात्र काही प्रकरणांकडे इंदिरा गांधी यांनी दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.
‘इंडिया : द क्रुशल इयर्स’ असे या पुस्तकाचे नाव असून ते हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक आणीबाणीच्या कालखंडाला समर्पित करण्यात आले आहे. त्या वेळी राजेश्वर हे गुप्तचर यंत्रणेत सहसंचालक पदावर होते आणि राजकीय कक्ष हाताळत होते. संजय गांधी यांच्या कुटुंब नियोजनाच्या विशेषत: मुस्लिमांमधील कुटुंब नियोजनाच्या मुद्दय़ाला देवरस यांचा पाठिंबा होता, असे राजेश्वर यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटण्यास देवरस इच्छुक होते. मात्र संघाबद्दल सहानुभूती असल्याचा शिक्का लागू नये याची काळजी इंदिरा गांधी यांनी घेतली आणि त्यामुळेच त्या भेटल्या नाहीत.