लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनामानाट्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील समन्वय आणखी वाढविण्यासाठी सुरेश सोनी यांच्याजागी नव्या संघ कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार सुरेश सोनी यांच्या जागी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर टीका करून लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. सरसरंघचालक मोहन भागवत यांनी समजूत काढल्यानंतर अडवाणींनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर संघ आणि भाजप या दोघांमधील समन्वय आणखी वाढविण्यासाठी सोनी यांच्या जागी नव्या संघ कार्यकर्त्याची नेमणूक करण्याची योजना आखण्यात आली. सुरुवातीला भैय्याजी जोशी यांचे सहायक दत्तात्रय होसबाले यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी समन्वयकाची भूमिका बजावण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर जोशी यांच्याकडेच हे काम देण्याचे ठरविण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर आणण्यासाठी घटक पक्षांना जमविण्यात लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यास पंतप्रधानपद कोणाला द्यावे, यासंदर्भात त्यांचे मत ऐकण्यात येईल. अडवाणी यांनाच काही महिन्यांसाठी पंतप्रधानपद देण्यात येऊ शकते आणि त्यानंतर ते मोदी यांना बहाल केले जाऊ शकते, असे संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी सांगितले.