भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ‘विवेक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलले आहेत. जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

“भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. इतकंच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात,” असंही सरसंघचालकांनी ठामपणे स्पष्ट केलं. “ज्यांच्या स्वहिताला बाधा निर्माण होते तेव्हाच कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविला जातो,” असंही त्यांनी सांगितलं.

“एखाद्या देशावर राज्य करणारा विदेश धर्म अजुनही अस्तित्वात आहे असं उदाहरण फक्त भारतात बघायला मिळतं,” असं मोहन भागवत यांनी यावेळी नमूद केलं. “भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला,” असंही यावेळी ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल, तसंच जर तुम्हाला भारतात राहायचं असेल तर हिंदूंचं वर्चस्व मान्य करावं लागेल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे”. मोहन भागवत यांनी यावेळी अयोध्या राम मंदिरासंबंधी बोलताना ते राष्ट्रीय भावनांचे मंदिर आहे, मानवतेचं मंदिर आहे असं सांगितलं.