राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुस्लिम गट असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे (एमआरएम) अयोध्येत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या मुस्लिमांनी गाईचे दूध पिऊन उपवास सोडला. आम्ही गोमांस खाणार नाही, असा निर्धारही मुस्लिमांनी या इफ्तार पार्टीत व्यक्त केला.

मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे अयोध्येत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी मंचातर्फे मुस्लिमांना निमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी गाईचे दूध पिऊन उपवास सोडला. गाईचे दूध आरोग्यासाठी उत्तम असून, त्यामध्ये वैद्यकीय गुण आहेत, हे मुस्लिमांनी मान्य केले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि मंचाचे आश्रयदाते इंद्रेशकुमार यांनी सांगितले. त्यांनी गाई पाळण्याचे महत्त्वही यावेळी मुस्लिमांना पटवून सांगितले. इस्लामसह कोणत्याही धर्मात गोहत्येला परवानगी नाही, असेही ते म्हणाले. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही इंद्रेश कुमार यांनी भाष्य केले. मातेच्या चरणात स्वर्ग आहे. या स्वर्गात तलाक मान्य नाही, असेही ते म्हणाले. गोहत्येच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी इस्लामसह कोणत्याही धर्मात गोहत्या मान्य नाही. यापुढे बीफ खाणार नाही, असंही मुस्लिमांनी मान्य केल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. गाईचे दूध हे आरोग्यासाठी चांगले असून त्याचे वैद्यकीय गुणही आहेत, असेही त्यांनी मान्य केल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. याशिवाय मोगल सम्राट बाबर हा घुसखोर होता, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. बाबर मोगल होता. तो घुसखोर होता. त्याला इस्लामबद्दल काहीही माहिती नव्हते, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.