गोहत्या बंदीवरुन देशभरात गदारोळ सुरु असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आता गोरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ईदच्या इफ्तार पार्टीमध्ये गोमांस भक्षण न करता गायीचं दूध प्यावे असा संदेश मुस्लिम मंचातर्फे दिला जाणार आहे. मुस्लिम मंचाने इफ्तार पार्टी एवजी ‘नो बीफ ओन्ली काऊ मिल्क’ या पार्टीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लिम मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल म्हणाले, मुस्लिमांवर गोहत्येचा आरोप होतो. पण आता गोरक्षणासाठी मुस्लिमही पुढे येऊ शकतात असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. या साठी एमआरएम तर्फे ही मोहीम चालवण्यात येणार आहे. ईदच्या या पार्टीमध्ये गायीच्या दुधाने बनवलेलं सरबत उपस्थितांना देण्यात येणार आहे. या संघटनेकडून यावेळी बीफचे दुष्परिणाम आणि गायीच्या दुधाचं महत्त्व तिथल्या उपस्थितांना देण्यात येणार आहे.

उत्तराखंडमध्ये रुडकीमध्ये एका १३ व्या शतकात बांधलेल्या दर्ग्याजवळ मुस्लिम राष्ट्रीय मंचाने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ३०० मौलवी आले होते. दोन दिवस हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात तिहेरी तलाकाच्या मु्द्द्यावरही चर्चा झाली. ‘नो बीफ ओन्ली काऊ मिल्क’ या कार्यक्रमाची संकल्पनाही याच कार्यक्रमातून मिळाल्याचे मंचाच्या वतीने सांगण्यात आलं.

देशातील अल्पसंख्याकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मुस्लिम मोर्चा करणार आहे असे पदाधिकारी सांगतात. हे काम करत असताना ते देशभरातल्या मदरशांना भेट देत त्यांना तिथे येणाऱ्यांना ‘भारतीय संस्कृती’ची ओळख पटवून देण्याचं आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मोर्चा करत आहे.