राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजे काही आयएसआय नसून ती राष्ट्रभक्तांची संघटना असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये सांगितले. मी पूर्णपणे संघाचा कार्यकर्ता असून, देशासाठी तुरुंगवासही भोगला आहे, अशीही आठवण त्यांनी यावेळी सांगितले. नवी दिल्लीमध्ये ‘अजेंडा आज तक’ या खासगी कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले.
ते म्हणाले, मी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. संघाच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी झालो होतो. त्यासाठी मी शिक्षण सोडले होते. देशसेवा करण्यासाठी मी तुरुंगवासही भोगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा संघाचे प्रचारक होते. आम्ही सगळे देशभक्तच आहोत. जर कोणी संघाचे कार्य करीत असेल, तर ते घटनेतील तरतुदींचे उल्लंघन ठरते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, सत्ता गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था पाण्यातून बाहेर आलेल्या माशासारखी झाली आहे. विरोधकांकडून मुद्दामहून मोदींची प्रतिमा खलनायक म्हणून रंगविण्यात येते आहे. स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच त्यांच्याकडून हा प्रयत्न करण्यात येतो आहे. देशातील स्वतंत्र न्यायव्यवस्था काँग्रेसने खोटे आरोप करून बदनाम केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.