अहमदाबादमध्ये पुढील आठवडय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे शिबीर आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांना ‘प्रिय’ असलेले संजय जोशी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या शिबिरात सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

गुजरातमधून या शिबिराला जवळपास २६ हजार स्वयंसेवक हजर राहणार असून शहराच्या वेशीवर असलेल्या दास्तान फार्मवर हे शिबीर २ जानेवारीपासून भरविण्यात येणार आहे.
जवळपास १५ वर्षांनंतर गुजरातमध्ये संघाचे शिबीर भरविण्यात येत असून २८०० गावांतील स्वयंसेवक त्यामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यकर्ता शिबिरासाठी २५ हजार ८०० कार्यकर्त्यांनी नावे नोंदविली आहेत, असे गुजरातमधील संघाचे प्रमुख जयंती भदेसिया यांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे २ ते ४ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या शिबिराला हजर राहणार आहेत. भागवत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. मोदी, जोशी आणि मनमोहन वैद्य या आजी-माजी प्रचारकांना निमंत्रण देण्यात आले आहे.