News Flash

मॉब लिंचिंग हा शब्द बाहेरून आलेला; भारतात असे प्रकार घडत नाहीत : मोहन भागवत

सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले, असंही ते म्हणाले.

“अनेक घटनांमुळे आपण हे वर्ष आठवणीत ठेवू. 2019 मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. सर्व जगाचं लक्ष याकडे लागून होतं. 2014 मध्ये जे परिवर्तन जे आलं होतं ते त्यापूर्वीच्या सरकारमुळे होतं की लोकांना परिवर्तन हवं होतं म्हणून होतं याची प्रचिती या निवडणुकीत आली. 2014 मध्ये ज्या सरकारला निवडलं त्यांना 2019 मध्ये त्याच सरकारला आणखी मोठ्या संख्येनं निवडून दाखवलं. जनतेनं पुन्हा भाजपावर विश्वास दाखवला. लोकशाहीत जनतेच्या मतांवर शासन चालतं. लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. लोकशाही आम्ही पश्चिमी देशांकडून घेतली असं पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

नागपुरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. त्यांपूर्वी मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंगदेखील संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते.

“सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ सरकारने एकट्याने घेतला नसून त्या निर्णयाला इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच सत्तेतील प्रत्येकाचं स्वागत व्हायला हवं. काश्मीरमधून बाहेर गेलेल्या काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन झालं पाहिजे, काश्मीर खोऱ्यातही रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हिंदूंची गोष्ट करणं म्हणजे मुस्लीमांचा विरोध करणं असं होत नाही,” असंही भागवत यांनी नमूद केलं.

“चांद्रयान मोहिमेबद्दलही त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. “चांद्रयान मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी सर्वांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. देशात सध्या उत्साह आणि आत्मविश्वासाचं वातावरण आहे. आपला देश संकटात आहे असं म्हणता येणार नाही. आपण पहिल्यापेक्षा आता अधिक सुरक्षित आहोत. आपल्या सीमा सुरक्षित आहेत, याची प्रचिती गेल्या वर्षांमध्ये आपल्याला आली आहे. आपल्या सैनिकांचं मनोबलही उंचावलं आहे” असंही ते म्हणाले. “देशात झालेलं परिवर्तन न आवडणारे लोकही आपल्या देशात आहे. परंतु केवळ आपला स्वार्थ पाहून काम करणारे लोकही आहे. देशातच नाही तर देशाबाहेरही असे काही लोक आहेत ज्यांना भारताचं चांगलं पहावत नाही. आपल्याला देशहितासाठी जगायचंय ही भावना मनात निर्माण झाली पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील काही लोकांनी लोकांनी कोणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. अशा हिंसक घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीएक संबंध नसतो. याउलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करत असल्याचे” भागवत म्हणाले. “आमच्याकडे लिंचिंग हा शब्द कधीच नव्हता. तो शब्द बाहेरून आला, असंही ते म्हणाले. हा भारत आपला आहे. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत सर्वांनी राहिलं पाहिजे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

आणखी वाचा : मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले!

इम्रान खानही शिकले

सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. संघाबद्दल काहीही पसरवलं जातं आहे. आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील संघाची बदनामी करायला शिकले असल्याचे मोहन भागवत म्हणाले.

सक्षम नागरिकांमुळेत स्वातंत्र्य – शिव नाडर 

“सक्षम नागरिकांमुळेच आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो. तसंच केवळ सरकार सामाजिक समस्यांवर मात करू शकत नाही. त्यासाठी सरकारसोबत खासगी संस्था, एनजीओ, नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे,” असं मत शिव नाडर यांनी बोलताना व्यक्त केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 10:09 am

Web Title: rss sarsanghchalak mohan bhagwat vijayadashmi praises modi government jud 87
Next Stories
1 भारतीय हवाई दल वर्धापनदिन: या १५ गोष्टी वाचून तुम्हाला IAF चा अभिमान वाटेल
2 नभ स्पर्श दीप्तम : जाणून घ्या हवाई दलाने आपले सामर्थ्य दाखविलेले ते 10 मोठे प्रसंग
3 पाकिस्तान ‘एफएटीएफ’च्या ‘करडय़ा यादी’तच राहणार?
Just Now!
X