घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सध्याच्या आरक्षण धोरणाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज स्पष्ट केले. आपल्या संघटनेच्या या मुद्दय़ावरील दृष्टिकोनाबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठीच टीकाकारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा विपर्यास केला, असेही संघाने सांगितले.

आरक्षण धोरणाचा पुनर्विचार केला जावा, असे वक्तव्य संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बिहारमधील धर्मनिरपेक्ष आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावरील इतर राजकीय पक्षांकडून संघावर सतत हल्ला चढवला जात आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाबाबत व्यक्त केलेली मते विपर्यस्त स्वरूपात सादर केली जात असून, आरक्षणाबाबत संघाच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि आरक्षणाबाबत आपल्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी होत असलेल्या अशा प्रयत्नांचा संघ निषेध करतो, असे संघाच्या ईशान्य क्षेत्राचे कार्यवाह डॉ. मोहन सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

देशात सामाजिक न्याय तसेच सामाजिक ऐक्य निश्चित करण्यासाठी घटनात्मक व्यवस्थेनुसार सध्याचे आरक्षणविषयक धोरण कायम राहावे असे संघाचे मत आहे. घटनेच्या संस्थापकांनी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टय़ा मागास लोक आणि अनुसूचित जाती-जमाती यांना आरक्षणाचे फायदे मिळायलाच हवे, असेही सिंग यांनी सांगितले.