देशातील विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशप्रेम माझ्या रक्तात आणि मनात आहे. जर कोणी देशविरोधी बोलले असेल तर त्याला कडक शासन झालेच पाहिजे. मात्र, त्यासाठी पूर्ण ‘जेएनयू’ला बदनाम करू नये, असे यावेळी राहुल यांनी म्हटले. यावेळी राहुल यांनी सरकारवर हल्ला चढवताना सध्या देशातील विद्यार्थ्यांवर संघाची आणि सरकारची विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. जे संघ आणि सरकारच्या विचारांना विरोध करतात त्यांना चिरडून टाकले जाते, हे रोहित वेमुल्ला आणि दिल्लीत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांतून स्पष्ट झाल्याचे राहुल यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवाद हा आपल्या रक्तात असल्याचे सांगितले. गांधी कुटुंबिय देशासाठी पुन्हापुन्हा बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.