नरेंद्र मोदी ही देशाला मिळालेली दैवी देणगी आहे, असे विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. राजस्थानमध्ये झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनंतर मंगळवारी दिल्ली येथे संघ आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी संघाकडून नरेंद्र मोदीच्या दैवीकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पक्षात व्यक्तीपुजेला थारा देऊ नका, कारण व्यक्तीपेक्षा संघटना सर्वोच्च असते, असा सल्लाही संघाकडून भाजप नेत्यांना देण्यात आला. या बैठकीला संघाचे सुरेश जोशी, कृष्ण गोपाळ, दत्तात्रय होसबळे हे नेते उपस्थित होते. भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा, सरचिटणीस रामलाल आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. यावेळी संघनेत्यांनी अमित शहा यांना भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्यावरील वाटचालीला हिरवा कंदील दाखवला. मात्र, त्याला विकासाची जोड देण्यात यावी, असा सल्ला संघाकडून शहांना देण्यात आला. काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली होती.