उत्तर प्रदेशमध्ये ७० पेक्षा अधिक जणांचे बळी घेणाऱ्या गोरखपूर दुर्घटनेसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रायश्चित घेतले पाहिजे, अशी भूमिका भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. योगी सरकार या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी टाळू शकत नाही, असे उत्तर प्रदेशातील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

या दुर्घटनेत कुणीही दोषी असले तरी राज्य सरकार म्हणून या सगळ्याची नैतिक जबाबदारी योगी सरकारची आहे. त्यामुळे सरकार या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. त्यासाठी सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रायश्चित घेतले पाहिजे, असे अवध प्रांताचे संघचालक प्रभू नारायण यांनी म्हटले. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वत:चे विचार मांडले आहेत. गोरखपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने प्रायश्चित दिवस आयोजित करावा, असे त्यांनी सांगितले. राजकारणी ‘शौर्य दिवस’ व ‘निषेध दिवस’ साजरा करत असतील तर प्रायश्चित घेण्यात गैर काय आहे, असा सवालही त्यांनी केलाय.

‘गोरखपूर रूग्णालयातील मृत्यू’ ही देशातली पहिली दुर्घटना नाही-अमित शहा

यावेळी त्यांनी गोरखपूर दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. चौकशीनंतर केवळ काही लोकांना बळीचा बकरा बनवून उद्देश साध्य होणार नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असला तरी गोरखपूर दुर्घटनेची यापूर्वीच्या घटनांशी तुलना करणे योग्य नाही. संपूर्ण देश या दुर्घटनेने हादरला आहे, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी या मुलांच्या शोकाकुल कुटुंबीयांचं सांत्वन त्यांच्या घरी जाऊन तर करायला हवंच, पण त्यासोबतच एक दिवसाचा उपवास करायला हवा. अशा संवेदनशील परिस्थितीचा सामना कसा करायचा ते या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिली. मी कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा मागत नाही आणि राजकीय भावनेतूनही बोलत नाही. देशात आज भाजपव्यतिरिक्त कोणताही राजकीय पर्याय नाही. त्यामुळे भाजपचे कोणतेही नुकसान होऊ नये असे मला वाटते, असे प्रभू यांनी सांगितले.

योगिक बालकांड