अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा रा.स्व.संघाचा आग्रह अजून कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा प्रश्न गांभीर्याने घेतील व भाजपचे निवडणूक आश्वासन पूर्ण करतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
रा.स्व.संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी रा.स्व संघाच्या येथील तीन दिवसांच्या बैठकीत सांगितले की, केंद्र सरकार राममंदिराचा प्रश्न गांभीर्याने घेईल अशी आशा वाटते. अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे अशी हिंदू समुदायाची इच्छा आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात राममंदिराचा उल्लेख केला होता. त्यासाठी आता आपल्याला काही काळ वाट पहावी लागेल.
राम मंदिराच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत चर्चा झाली काय, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राम मंदिराचा प्रश्न चर्चेला आहे व राम मंदिराचा प्रश्न आहे हे आधी मान्य करायला हवे. भव्य राममंदिर उभारण्याची गरज आहे. तेथे पूजा होते, लोक भेट देतात. हिंदूूंना तेथे भव्य राममंदिर हवे आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, सरकारला राममंदिर उभारणीसाठी आता २०१९ पर्यंत बराच वेळ आहे. राममंदिर हे देशाच्या हिताचे आहे. विश्व हिंदू परिषद व धार्मिक नेत्यांना आमचा या मुद्दय़ावर पाठिंबा आहे.