केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. के आनंद असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. २०१४ मध्ये मा.क.पा. कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप के आनंदवर होता. या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. त्रिसूरमध्ये आनंद बाईकवरून जात होता. तेवढ्यात एका कारने आनंदच्या बाईकला धडक दिली. त्यानंतर आनंद खाली पडला, कारमधून काही लोक खाली उतरले. या  अज्ञात लोकांनी आनंदवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या के आनंदला रूग्णालयात नेले जात होते, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.

माकपाच्या नेत्यांनीच के आनंदची हत्या घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर याप्रकरणातील दोषींना लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे. ही हत्या नेमकी कोणी केली असावी याबाबत सध्या अंदाज व्यक्त करता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही हत्या राजकीय हेतून प्रेरित होती असेही तूर्तास पोलिसांनी म्हटलेले नाही. काही महत्त्वाचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत त्याआधारे आम्ही मारेकऱ्यांचा शोध घेत आहोत असे पोलिसांनी स्पष्ट केले.

डाव्यांकडून सुरु असलेला हिंसाचार आणि रक्तपात थांबलेला नाही. केरळमध्ये जंगलराज सुरु आहे अशी टीका भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष राजशेखरन यांनी केली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. या हत्येमागे दुसरेतिसरे कोणीही नसून डावेच आहेत असाही आरोप अमित शहा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे. तसेच राज्यातील वाढत्या हिंसाचाराबाबत आणि हत्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यात नेमके काय सुरू आहे याबाबत भाष्य करावे अशीही मागणी केली आहे.