राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरी ईद निमित्त बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशभरात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देतात पण ती कुर्बानी देण्याऐवजी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरीच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याची ठरवली आहे. लखनौच्या अवधमध्ये असलेल्या मुस्लिम मंचाच्या शाखेने हा निर्णय घेतला आहे.
यासाठी मुस्लिम मंचाच्या अवध शाखेमध्ये आज ५ किलोचा बकरीच्या आकाराचा केक आणला जाणार आहे. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बिर्याणीची दावत असते. पण मुस्लिम मंचाचे सगळेच स्वयंसेवक या दिवशी मांसाहारी बिर्याणीची दावत न करता शेवया, दही वडा खाऊन आपल्या मित्रांसोबत ईद साजरी करणार आहेत. ‘बकरी ईदच्या निमित्ताने आम्हाला मानवतेचा संदेश जगभर पोहचवायचा आहे. बकरी ईद निमित्त केवळ कोणत्याही कारणासाठी बक-यांची कत्तल करुन फक्त त्यांचे मांस खाणे चुकीचे आहे त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने बकरी ईद साजरी करणार आहोत’ अशी माहिती राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या एका संयोजकांनी दिली आहे. तसेच कुर्बानी न देता केक कापण्यासारखा उपक्रम मंचाच्या इतर शाखांत देखील राबवला जाईल असेही अवध शाखचे स्वयंसेवक रईस खान यांनी सांगितले.