नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दुसऱ्या भारत दौऱ्याच्या वेळी घातलेला सूट चांगलाच चर्चेचा विषय ठरला. मोदींचे संपूर्ण नाव या सूटवर गोल्डन एमब्रॉडरीमध्ये लिहण्यात आले होते. या सूटवरून आणि त्याच्या किंमतीवरून अनेक वादही झाले. अनेक वृत्तपत्रांमधील माहितीनुसार त्या सूटची किंमत १० लाखांच्या आसपास होती. या महागड्या सूटवरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार सूट-बूटवाली सरकार असल्याची टिकाही केली होती. या घटनेला काही वर्षे उलटी असली तरी मोदींच्या कपड्यांची स्टाईल तेव्हापासून चर्चेचा विषय ठरत आली आहे. आता पुन्हा याच संदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत करण्यात आलेल्या एका अर्जात पंतप्रधान नरेंद्र मोदी कपड्यांवर किती पैसे खर्च करतात यासंदर्भातील माहिती मागण्यात आली आहे. मात्र या प्रश्नाला सरकारने दिलेल्या उत्तरावरून यापुढे मोदींच्या कपड्यांच्या किंमतीवरून होणारे वाद शांत होतील असेच चित्र दिसत आहे.

मोदी कपड्यांवर किती खर्च करतात अशा आशयाच्या माहिती अधिकाराच्या अर्जला पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरात काही खुलासे कऱण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या खाजगी पोशाखाचा खर्च भारत सरकार करत नसल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. १९९८ पासून आजपर्यंत पंतप्रधानांच्या कपड्यांवर किती पैसे खर्च करण्यात आले यासंदर्भातील माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सब्रवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून मागवली होती. म्हणजेच अटल बिहारी वाजपेय, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदींच्या काळात कपड्यांवर किती पैसे खर्च करण्यात आले या संदर्भातील माहिती मागवण्यात आली होती.

या अर्जाला दिलेल्या उत्तरामध्ये पंतप्रधान कार्यालयाने मागवण्यात आलेली माहिती ही खाजगी असून अशी माहिती सरकारी नोंदीमध्ये नसते असे सांगितले आहे. तसेच पंतप्रधानांच्या कपड्यांवरील खर्च सरकारी तिजोरीतून केला जात नाही असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या या उत्तरामुळे पंतप्रधानांच्या कपड्यांवर भारत सरकार किती खर्च करते यासंदर्भातील वाद कायमचे संपले असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि अर्जदार रोहित यांनी व्यक्त केले आहे. मोदींच्या कपड्यांवरून उगच वाद घालणाऱ्या विरोधी पक्षांनी आता तरी वाद घालू नयेत अशी अपेक्षा भाजपने व्यक्त केली आहे.

भारताच्या पंतप्रधानांनी चांगली कपडे परिधान केली तर त्यामुळे जगासमोर देशाची चांगली प्रतिमा उभी राहते. मोदींनी एकदाच डिझायनर सूट घातला होता. आणि त्यानंतर त्या सूटचा लिलाव करुन त्यामधून उभा राहिलेला पैसा स्वच्छ भारत मोहिमेसाठी देण्यात आला होता हे आपण विसरता कामा नये असे मत भाजप नेते जीवन गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केले आहे. मोदींनी ओबामांच्या भारत भेटी दरम्यान घातलेला सूट २० फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या लिलावामध्ये ४ कोटी ३१ लाख ३१ हजार ३११ रुपयांना सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने खरेदी केला होता.