चित्रपट लेखक सलीम खान, माजी राजनैतिक अधिकारी के. एस. बाजपेयी व आध्यात्मिक गुरू श्रीश्री रवीशंकर, महंमद बुऱ्हाणुद्दीन व माता अमृतानंदमयी यांनी यंदाच्या वर्षी पद्म पुरस्कार नाकारला, पण योगगुरू रामदेव बाबा यांना पद्म सन्मान देऊ केला नव्हता असे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे.
आधीच्या बातम्यांनुसार रामदेवबाबा यांनी पद्म पुरस्कार नाकारल्याचे सांगण्यात आले होते. अलीकडेच रामदेव बाबा यांनी पद्म पुरस्कार व नोबेल पुरस्कारातही मोठय़ा प्रमाणात दबावगट काम करतात व हे पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असे विधान केले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी नेमक्या कोणत्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येणार होता त्यांची नावे मागवली होती पण त्यात योगगुरू रामदेव बाबा यांचे नाव नव्हते असे निष्पन्न झाले आहे.
२६ जानेवारी २०१५ रोजी हे पुरस्कार जाहीर होण्याच्या दोन दिवस अगोदर रामदेव बाबा यांनी असा दावा केला होता की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून आपण पद्म पुरस्कार नाकारला होता. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबर, ५ डिसेंबर व १३-१४ डिसेंबर २०१४ रोजी या पुरस्कार समितीच्या बैठका झाल्या त्याचा तपशील उपलब्ध नाही.
ज्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती पण पद्म पुरस्कारासाठी त्यांचा विचार झाला नाही ती नावे सांगण्यास नकार देण्यात आला आहे कारण सीबीआय, आयबी व कर अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, ही माहिती गोपनीय असल्याने माहिती अधिकार कायद्यान्वये देण्यात येऊ नये.