लॉसएंजल्स : दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र विस्तारत असताना आता वैज्ञानिकांनी रूबिक क्युबचे तर्कावर आधारित कोडे सोडवण्यासाठी अलगॉरिथम विकसित केले आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे संगणकाच्या मदतीने सोडवण्यात यश आले आहे. माणसाकडून कुठलेही प्रशिक्षण नसताना यंत्राच्या मदतीने हे कोडे सोडवता येते हे स्पष्ट झाले आहे.

हंगेरीच्या स्थापत्यशास्त्रज्ञाने १९७४ मध्ये रूबिक क्यूबचा शोध लावला होता. हे कोडे सोडवताना अनेकांना जड जाते. डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सोडवण्यात यश आले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी अलगॉरिथम तयार केला आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे त्याच्या मदतीने सोडवण्यात आले. हे कोडे सोडवण्याच्या अब्जावधी शक्यता असताना त्याचा उलगडा करणे अवघड असते. यात घनाकृतीला सहा बाजू असतात व त्यातील संगती लावायच्या असतात.

जर्नल नेचर मशीन इंटेलीजन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सर्व चाचणी शक्यतांच्या मदतीने सोडवण्यात शंभर टक्के यश आले. त्यात कमीत कमी काळात सोडवणूक करण्याचा मार्ग वापरण्यात आला. अलगॉरिथमचा वापर हा टाइल पझल, लाइट आउट व सोकोबन या गेम्ससाठीही करता येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगातील उत्तम बुद्धिबळ पटू , गो प्लेयर्स यांना हरवू शकते, पण रूबिक क्यूबचे कोडे संगणकाने सोडवणे अवघड होते त्यामुळे हा प्रयत्न करण्यात आला असे संगणक विज्ञान प्राध्यापक पिअरी बाल्डी यांनी म्हटले आहे. रूबिक क्यूबचे कोडे सोडवण्यासाठी प्रतीकात्मक, गणिती व अमूर्त विचारांची गरज असते. याचाच अर्थ सखोल विचार करूनच ते सोडवता येते. विचार,कार्यकारणभाव, नियोजन व निर्णयक्षमता या घटकांना यात महत्त्व आहे. डीपक्यूब ए संगणकाला दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर पुढील अनेक चाली त्याने स्वत: शोधून काढल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ वीस चालीत व कमीत कमी पायऱ्यांत हे कोडे सोडवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेत महत्वाची पायरी

सिरी, अ‍ॅलेक्सा इतर माध्यमातून आपण रोज कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने वापरत असतो. पण त्यांना तुम्ही सहज मूर्खात काढू शकता असे बाल्डी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक चतुराईने, जास्त ठोसपणे, कार्यकारणभावाने वापरण्यासाठी प्रगत करावी लागेल त्यासाठी हा प्रयोग उपयुक्त आहे असे बाल्डी यांचे म्हणणे आहे.