कर्नाटक विधानपरिषदेमध्ये मंगळवारी जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. पण त्याआधीच काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचले.

सभागृहाचे कामकाज चालू होताच विधानपरिषदेतील काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणे असवैधानिक आहे, असे या आमदारांचे म्हणणे होते. अखेर हाऊसमधील मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.

उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. काँग्रेसने विधानपरिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.

“काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचलं. त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं. विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही बघितलेला नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, तो विचार करुन मला लाज वाटते” असे भाजपाचे आमदार लेहर सिंह सिरोया या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले.
काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी मात्र भाजपावर टीका केली. “भाजपा आणि जेडीएसने सभापतींना बेकायद पद्धतीने खुर्चीवर बसवले. भाजपा अशा असंवैधानिक पद्धतीने वागतेय हे दुर्देवी आहे. आम्ही त्यांना खुर्चीवरुन उतरायला सांगितले होते. पण ते बेकायद तिथे बसले असल्याने आम्ही त्यांना तिथून हटवावे लागले” असे प्रकाश राठोड म्हणाले.