संसदेच्या चालू अधिवेशनाच्या सुरुवातीपासून स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दय़ावरून लोकसभेच्या कामकाजात वारंवार अडथळा आणणाऱ्या सहा काँग्रेस सदस्यांसह आंध्र प्रदेशच्या १० सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांच्या चांगलाच अंगाशी आला. या प्रस्तावामुळे झालेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले, यामुळे अन्न सुरक्षा विधेयकाला गुरुवारीही मुहूर्त लाभला नाही.
५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व तेलगू देसम पार्टीच्या काही सदस्यांनी कामकाजात वारंवार अडथळे आणले आहेत. या सदस्यांच्या निषेधामुळे चालू अधिवेशनात आतापर्यंत अपेक्षित कामकाज झालेले नाही. त्यामुळे असे अडथळे आणणाऱ्या काँग्रेसच्या सहा आणि तेलगू देसम पार्टीच्या चार सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मी मांडत आहे, असे संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी सांगितले. कमलनाथ यांच्या या प्रस्तावानंतर काँग्रेस आणि तेलगू देसमच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी अध्यक्षांसमोरच्या हौदात धाव घेत या प्रस्तावाविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर लगेचच काँग्रेस, तेलगू देसमच्या संबंधित सदस्यांनीही हौदात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. व्ही. वेणुगोपाल रेड्डी यांनी सभापतींसमोरील माइक खेचण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळामुळे लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी दुपारी सव्वाबारापर्यंत कामकाज तहकूब केले. अध्र्या तासानंतर लोकसभा सुरू झाल्यानंतरही हाच गदारोळ कायम राहिल्याने त्यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या टीडीपीच्या सदस्यांमध्ये के. निम्मला, के. एन. राव, एम. वेणुगोपाल रेड्डी आणि एन. शिवप्रसाद यांच्यासह काँग्रेसच्या ए. साई प्रताप, ए. वेंकटरामी रेड्डी, एल. राजगोपाल, एम. श्रीनिवासुलु रेड्डी, व्ही. अरुणा कुमार आणि जी. व्ही. हर्षां कुमार यांचा समावेश आहे.