उत्तर प्रदेश सरकारने सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांना निलंबित केल्याप्रकरणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपर्कात असून, या विषयाची सविस्तर माहिती मिळवण्यात येईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. 
मशिदीची भिंत परवानगी न घेता पाडल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने दुर्गाशक्ती नागपाल यांना निलंबित केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून संबंधित प्रकरणात लक्ष घालण्याचे सुचवले होते. पंतप्रधानांकडे सनदी अधिकाऱयांच्या संदर्भातील महत्त्वाच्या बाबी बघणाऱया कार्मिक खात्याचा कार्यभारही आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. या घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे. सनदी अधिकाऱयांसंदर्भात काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यांचे पालन केले जाईल.
दुर्गाशक्ती यांच्या निलंबनासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.