राजस्थानमधील सत्ता वाचविण्यासाठी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच, पक्षाची सत्ता असलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे.

विषारी दारुकांडामुळे १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेल्यावर या घटनेची सीबीआय किंवा अंमलबजावणी संचालनाकडून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या दोन खासदारांनी स्वपक्षाच्या सरकार विरोधात केल्याने या खासदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी मंत्र्यांनीच केली आहे.

प्रतापसिंग बाजवा आणि समशेरसिंग डुलो या दोन काँग्रेस खासदारांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आघाडीच उघडली आहे. गेल्या आठवडय़ात पंजाबमध्ये विषारी दारु प्राशन केल्याने १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला. या घटनेची सीबीआय व अंमलबजावणी संचालनयाकडून चौकशी करण्याची मागणी या दोन खासदारांनी राज्यपालांची भेट घेऊन केली होती.

स्वपक्षाच्या विरोधात अविश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. या दोन खासदारांच्या विरोधात कारवाईची मागणी पंजाब काँग्रेसने केली आहे. तर पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी या दोन खासदारांची काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. या साऱ्या घटनेवरून काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये सारे काही आलबेल नाही हेच स्पष्ट झाले.