22 November 2019

News Flash

संतापजनक! छेडछाडीला विरोध केल्याने तरुणाने चार महिलांना कारने चिरडले, दोघींचा मृत्यू

एका लग्न समारंभातून परतताना या कुटुंबावर अशा अमानुष प्रसंगाला समोरे जावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बुलंदशहर (उ.प्र.) : तरुणीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलांना तरुणाने कारने चिरडले.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणीच्या छेडछेडीला विरोध केल्याने एका तरुणाने चार जणांना कारखाली चिरडल्याची घटना घडली असून यामधील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर संतापलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी महामार्ग रोखून धरला. एका लग्न समारंभातून परतताना या कुटुंबावर अशा अमानुष प्रसंगाला समोरे जावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, एका लग्नसमारंभातून घरी परतल्यानंतर एक तरुण आपल्या घराबाहेर लघुशंका करीत असल्याचे पीडित कुटुंबातील काही महिलांनी पहिले आणि त्याला हटकले. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने त्या कुटुंबातील एका तरुणीशी छेडछाड करायला लागला. यावर महिलांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तो त्यांना धमकी देऊन पळून गेला.

त्यानंतर काही वेळाने आरोपी नकुल नामक तरुण पुन्हा आपल्या काही मित्रांना घेऊन आला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या महिलांच्या अंगावर वेगाने कार चालवली. यामध्ये सत्यवती आणि उर्मिला या सख्या जावांचा जागीच मृत्यू झाला. सत्यवती यांचा मुलगा आणि आणखी एक जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्याची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री उशीरा मृत महिलांचे शवविच्छेदन करुन त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. मात्र, संतापलेल्या या कुटुंबाने मंगळवारी सकाळी महिलांचे पार्थिव महामार्गावर ठेऊन रस्ता रोको केला आणि प्रशासनाकडे आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी नकुल आणि त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी पथके रवाना केली.

First Published on June 25, 2019 4:32 pm

Web Title: run car over on four members of family two women of them died after protest against girl molestation aau 85
Just Now!
X