विवाहावेळी मास्क न घातल्याने पंजाबमधल्या जोडप्यावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे पळून लग्न केलेल्या या जोडप्याने संरक्षणासाठी कोर्टात धाव घेतली होती. कुटुंबीय या लग्नाविरोधात होते म्हणून त्यांनी लग्नानंतर संरक्षणासाठी कोर्टात धाव घेतली असता विवाहावेळी मास्क न घातल्याचं निष्पन्न झालं. यामुळे पंजाब व हरयाणा हायकोर्टाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लग्नाच्या फोटोंमधून जोडप्याने मास्क न घातल्याचं स्पष्ट होताच उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती हरी पाल वर्मा यांच्या खंडपीठाने हा दंड ठोठावला. “लग्नाच्या फोटोंमध्ये वर-वधू आणि इतर उपस्थित लोकांनी मास्क घातला नाही. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित जोडप्याने १५ दिवसांच्या आत १० हजार रुपयांचा दंड भरावा. ही रक्कम होशियारपूरमधल्या लोकांना मास्क पुरवण्यासाठी वापरण्यात येईल”, असे आदेश खंडपीठाने दिले. याचसोबत या नवविवाहित दाम्पत्याला कुटुंबीयांकडून कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य ती पाऊलं उचलण्याचे आदेश गुरदासपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत.

करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देशात मास्क वापरणं बंधनकारक आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे हे नियम न पाळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जात आहे.