रुपयातील घसरण अजूनही सरूच आहे. गुरूवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रूपया ७०.८२ या नव्या नीचाकांवर पोहोचला. रुपयातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. बुधवारी रूपया ७०.५९ वर बंद झाला होता.

डॉलरला वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निधी काढण्याचे प्रमाण वाढल्याने ही घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने रिफायनरी कंपन्यांची डॉलरमध्ये मागणी वाढली आहे. त्याचबरोबर परकीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीमुळेही रुपया प्रभावित झाला आहे.

रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामान्य व्यक्तीच्या खिशावर पडणार आहे. यामुळे फ्रिज, टीव्ही, एसी आणि लॅपटॉपसारख्या ग्राहकोपयोगी आणि इलेक्टॉनिक साहित्याच्या किंमतींमध्ये वाढ होईल. यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.

गेल्या काही व्यवहारांपासून रुपयासह डॉलरच्या तुलनेत अनेक आशियाई चलनांमध्ये तीव्र स्वरूपाची घसरण दिसून येत आहे. रुपयाच्या तीव्र स्वरूपातील घसरणीबाबत केंद्रातील माेदी सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तथापि रुपयाचे डॉलरच्या तुलनेत सत्तर पल्याड घसरणे ही प्रतिकूल जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत चलनवाढीच्या चिंतेचा संयुक्त परिणाम असून, वास्तविक प्रभावी विनिमय दरात रुपयाचा मूल्य ऱ्हास तितकासा झालेला नाही, असा अर्थमंत्रालय आणि निती आयोगाचा दावा आहे.

चालू वर्षात विदेशी संस्थांनी तब्बल २८ कोटी डॉलर भारताच्या समभाग आणि रोखे बाजारातून काढून घेतले आहेत, त्याचा रुपयाच्या मूल्यावर ताण दिसून येत आहे. चलन अस्थिरतेमुळे देशाच्या परराष्ट्र व्यापार तसेच वित्तीय तुटीवर दबाव निर्माण झाला आहे. व्यापार तूट जूनमध्ये १८ अब्ज डॉलर अशी गेल्या पाच वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे.