उत्तर भारताच्या एका कोपऱ्यातल्या छोट्याश्या गावात राहणाऱ्या आशा देवी. सात माणसांना पोसता यावं म्हणून त्या आत्तापर्यंत किती वेळा उपाशी झोपल्यात याचा त्यांनाही ताळमेळ लागत नाही. २० हजाराच्या कर्जासाठी त्यांना आपली जमीन गहाण ठेवावी लागली. पैश्यांअभावी त्यांनी दुध घेणं बंद केलं, तेलाचा वापर कमी केला आणि डाळी तर दहा-बारा दिवसांतून एकदाच शिजवल्या जातात. बांधकाम मजूर असलेला नवरा काम नसल्याने घरात बसून आहे.

मला बऱ्याचदा उपाशीच झोपावं लागतं. गेल्या आठवड्यात तर किमान २ वेळा मी उपाशी झोपलेय..पण मला नीटसं आठवत नाही, या आशा देवींनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांना मोफत धान्याची सोय तर केली. मात्र एका परिवाराला हे धान्य पुरेसं नाही, आशा देवींनी आपली व्यथा बोलून दाखवली.

असे अनेक परिवार ग्रामीण भारतात पाहायला मिळतात. जगच थांबल्याने हातावरचं पोट असलेल्यांचं जगही थांबलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर, पोटात आग, हातात पैसा नाही, बाहेर जीवघेणा आजार, तो झाला तर उपचाराला पैसा नाही…हे प्रश्न देशातल्या हजारो कुटुंबांसमोर आ वासून उभे आहेत. रॉयटर्स या वृत्तवाहिनीने ग्रामीण भारताचं सर्वेक्षण केलं आहे. भारतातल्या मोठ्या राज्यांमधल्या आठ गावांतल्या ७५ कुटुंबांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की, या लोकांचं घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटलं आहे. यापैकी दुपटीपेक्षा जास्त हिस्सा कर्जातच जातो.

हेही वाचा – PM Kishan Samman Nidhi Yojana : जाणून घ्या… ऑनलाईन यादीत नाव कसे चेक कराल

मार्च २०२० पासून उधारी मागण्यामध्ये तिप्पट वाढ झाली आहे आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक उधारी ही गेल्या सहा महिन्यातली आहे, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या ७५ कुटुंबांचं एकूण उत्पन्न करोनाकाळापूर्वी साधारण ८ लाख १५ हजार रुपये होतं मात्र आता ते केवळ २ लाख २० हजारांवर आलं आहे.

जुग्गी लाल या महिलेने सांगितलं की, तिला तिच्या दिव्यांग नवऱ्यासाठी औषधं घ्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळे तिच्यावर ६०हजार रुपयांचं कर्ज झालं आहे. ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर जो करोनाकाळापूर्वी ६ टक्के होता, तो गेल्या जून महिन्यात ८.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातल्या प्रत्येक क्षेत्राला या करोनाचा फटका बसला आहे. किराणा माल, चहाच्या टपऱ्या असे व्यवसाय तर ठप्प झाले आहेत. अनेक परिवारांना तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय गुंडाळून बसावं लागत आहे.

गोश मोहम्मद यांचं किराणा मालाचं दुकान आहे. करोनाकाळापूर्वी ते प्रतिदिन ८००० रुपयांपर्यंतची विक्री करायचे पण करोनानंतर हा आकडा हजाराच्याही खाली आला आहे. त्यांनी घाऊक विक्रेत्याकडून ६० हजारांचा माल उधारीवर घेतला आहे. मात्र, त्याचे पैसे ते गेल्या ६ महिन्यांपासून फेडू शकले नाहीत. ते सांगतात, मला वाटतंय मला आता दुकान घाऊक विक्रेत्यांना विकावं लागेल. कारण मी त्यांच्याकडून घेतलेली उधारी फेडू शकत नाही. मी माल तर विकला मात्र, त्याचे हवे तेवढे पैसे आलेच नाही.