जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे व राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाचे रशियाने समर्थन केले आहे. भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश काळजी घेतील अशी अपेक्षा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची दोन्ही देशांनी काळजी घ्यावी. भारत-पाकिस्तानमधील संबंध बिघडू नयेत. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य रहावेत हीच आमची कायम भूमिका राहिली आहे असे रशियाने म्हटले आहे.

राजकीय आणि राजनैतिक मार्गाने दोन्ही देश मतभेदांवर तोडगा काढतील अशी रशियाला अपेक्षा आहे. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करुन राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. काश्मीर प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी युद्धासारखी स्थिती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय सुमदायाकडे धाव घेऊनही कुठलाही देश पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिलेला नाही. अनेक देशांनी हा भारत अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. ज्या तालिबानला पाकिस्तानने उभे केले त्यांनी सुद्धा हिंसाचारापासून दूर राहण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे.