चिता (रशिया) : रशिया, चीन आणि मंगोलिया यांच्या सर्वात मोठय़ा संयुक्त युद्धसरावाला रशियाच्या पूर्वेकडील प्रदेशात मंगळवारी सुरुवात झाली. वोस्तोक-२०१८ नावाने होत असलेल्या या लष्करी सरावात ३ लाख सैनिक, ३६,००० लष्करी वाहने, ८० युद्धनौका आणि १००० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन सहभागी होत आहेत. त्यात चीनचे ३५०० सैनिकही भाग घेत आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पूर्वेकडील व्लाडिव्होस्टॉक या शहरात आर्थिक परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर या युद्धसरावांना सुरुवात करण्यात आली. आर्थिक परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हेदेखिल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. पाश्चिमात्य देश आणि नाटो संघटनेने हा युद्धसराव म्हणजे मोठय़ा युद्धाची तयारी असल्याची टीका केली आहे. पाश्चिमात्य देशांशी रशियाचे संबंध बिघडत असताना हा सराव होत आहे.

सोव्हिएत युनियनच्या काळात १९८१ साली तत्कीलीन वॉर्सा पॅक्ट संघटनेच्या सदस्य देशांबरोबर मोठा युद्धसराव करण्यात आला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा युद्धसराव असल्याचे रशियाने म्हटले आहे. त्यात रशियाची इस्कंदर आणि कॅलिब्र क्षेपणास्त्रे, टी-८० आणि टी-९० रणगाडे, एसयू-३४ आणि ३५ लढाऊ विमाने आदी अद्ययावत शस्त्रसामग्री वापरली जात आहे.