गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले. आपल्या मुलीला ही लच टोचण्यात आली असून, तिला बरे वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल. सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू  केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.

१८ जूनला रशियन लशीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला ती ३८ जणांना टोचण्यात आली. या सर्वामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली. ही लस १ जानेवारी २०२१ पासून जनतेसाठी उपलब्ध होईल, असे रशियाने म्हटले आहे.

वैज्ञानिकांनी या लशीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिपूर्ण चाचण्यांशिवाय ही लस वापरणे घातक असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रयोग न करताच या लशीची नोंदणी करणे चुकीचे असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य संघटनेकडून आढावा

करोनावरील लशीस जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवण्यासाठी कठोर चाचण्या, फेरतपासणी आवश्यक आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. याबाबत रशियाशी संपर्कात असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. लस तयार करताना सुरक्षेशी तडजोड करू नये. याबाबत आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशी सूचना आरोग्य संघटनेने रशियाला गेल्या आठवडय़ात केली होती. चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेल्या जगभरातील सहा लशींमध्ये रशियाच्या लशीचा समावेश नाही.