रशियातील पश्चिम सायबेरिया येथे हेलिकॉप्टर कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी हा अपघात झाला असून हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेम्बर्स आणि १५ प्रवासी होते.

पश्चिम सायबेरियातील एक हेलिकॉप्टर ऑईल स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना घेऊन निघाले होते. टेक ऑफ केल्यानंतर हेलिकॉप्टरचा पंखा कंटेनरमध्ये अडकला आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात हेलिकॉप्टरमधील १८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

‘हेलिपॅडवर दररोज हेलिकॉप्टरची वर्दळ असते. शनिवारी देखील एक हेलिकॉप्टर टेक ऑफ उतरत होते. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरद्वारे कंटेनर हलवण्याचे काम सुरु होते. याच दरम्यान हेलिकॉप्टरचा पंखा कंटेनरमध्ये अडकला आणि हा अपघात झाला. या अपघातात नेमकी चूक कोणाची याचा तपास सुरु आहे, असे हेलिकॉप्टरची मालकी असलेल्या कंपनीने सांगितले. दुसरे हेलिकॉप्टर सुखरुप लँडिंग करण्यात यशस्वी झाल्याने आणखी जीवितहानी टळली, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.