युक्रेन प्रश्नावरून निर्माण झालेला तिढा वाढतच चालला आहे. युरोपीय महासंघाने रशियाच्या १५ अधिकाऱ्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. तर असे निर्बंध जाहीर करणाऱ्या महासंघाला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत रशियाने आपल्या संतापास वाट करून दिली आहे.  
  मात्र महासंघाच्या निर्णयामुळे र्निबध लादलेल्या रशियन अधिकाऱ्यांची आणि समर्थकांची एकूण संख्या ४८ वर गेली आहे.
अमेरिकेने रशियाचे सात सरकारी अधिकारी आणि व्लादिमिर पुतिन यांच्याशी संलग्न असलेल्या १७ कंपन्यांवर र्निबध लादण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर युरोपीय महासंघाने ब्रुसेल्स येथे झालेल्या बैठकीनंतर सदरहू निर्णय जाहीर केला.
मात्र रशिया हा युरोपीय महासंघाचा सर्वात मोठा ‘व्यापारी मित्र’ आहे. तसेच रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायूंचा पुरवठाही मोठय़ा प्रमाणावर केला जातो. या बाबी लक्षात घेत रशियाला आर्थिक र्निबधांचा सामना करावा लागेल, ऊर्जा क्षेत्रास लक्ष्य केले जाईल, अशा धमक्या महासंघाने दिल्या आहेत.
शुक्रवारी रशियासह चर्चा
पोलंडची राजधानी वॉर्सा येथे येत्या शुक्रवारी युरोपीय महासंघाचे सदस्य, रशियाचे प्रतिनिधी आणि युक्रेनचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होणार आहे. युरोप आणि युक्रेनला रशियाकडून केला जाणारा नैसर्गिक वायूचा आणि तेलाचा पुरवठा हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील, असे युरोपीय आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
२३ रशियन नागरिकांना जपानने व्हिसा नाकारला
युक्रेनच्या मुद्दय़ावरून रशियाच्या २३ नागरिकांना व्हिसा नाकारण्यात येईल, अशी घोषणा जपानने मंगळवारी केली. युक्रेनप्रश्नी रशियावर र्निबध लागू करण्याच्या व्यूहरचनेचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. अमेरिका आणि युरोपने रशियावर नव्याने र्निबध लागू केल्यानंतर तातडीने जपानने ही घोषणा केली.ज्या रशियन नागरिकांना व्हिसा नाकारण्यात येणार आहे, त्यांची नावे जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली नाहीत. मात्र, रशियाच्या काही अधिकाऱ्यांची नावे संबंधित समाविष्ट असण्याची शक्यता स्थानिक माध्यमांनी व्यक्त केली. जपानचे परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. सर्व पक्ष, गटांनी जबाबदारीने तसेच संयमाने वर्तन करावे, असे आम्हाला वाटत असल्याचे किशिदा यांनी सांगितले. राजनैतिक स्तरावरच युक्रेनच्या मुद्दय़ावर समाधानकारक तोडगा निघेल, अशी आम्हाला मनापासून आशा वाटत असल्याचे ते म्हणाले.