लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या रशियातील मिग एअरक्राफ्ट या कंपनीने जानेवारीमध्ये लाँच केलेले मिग- ३५ हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मिग- ३५ हे विमान अमेरिकेच्या लढाऊ विमानालाही हरवू शकतं असे मिग एअरक्राफ्टचे म्हणणे आहे.

मिग एअरक्राफ्टने मिग- ३५ हे विमान जानेवारीमध्ये बाजारपेठेत आणले होते. या बहुउद्देशीय लढाऊ विमानाचे प्रमोशनही सुरु झाले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इया तारासेंको यांना भारताविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. भारताने हे विमान खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, कंपनीने भारत आणि अन्य देशांमध्ये या विमानाची विक्री करण्यासाठी प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. भारताच्या हवाई दलाने विमान खरेदी करण्यात रस दाखवला आहे. त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील कंत्राटासाठी आम्ही प्रस्ताव तयार करत असून याबाबत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. मिग-३५ विमान सर्वश्रेष्ठ असून लॉकहीड मार्टिनच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांपेक्षा मिग-३५ सर्वोत्तमच आहे असा दावाही कंपनीने केला आहे.

भारतात गेल्या ५० वर्षांपासून मिग विमानांचा वापर केला जात आहे. मिग कॉर्पोरेशनने मिग-३५ साठी सुरुवातीला ज्या देशांमध्ये प्रस्ताव मांडण्याची तयारी केली त्यामध्ये भारताचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाला अत्याधुनिक विमानांची गरज असल्याने हा करार मार्गी लागणार का, भारताच्या अटींची पूर्तता करण्यात कंपनी तयार होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.