मॉस्को : अफगाणी तालिबानशी थेट बोलणी करण्यास अनुकूल स्थिती निर्माण करण्यासाठी पुढाकाराचा भाग म्हणून रशियाने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या प्रश्नावर एक परिषद घेतली, यावेळी तालिबानचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवाय प्रथमच भारताने यात हजेरी लावली हे विशेष आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी मॉस्को येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या बैठकीत सांगितले की, अफगाणिस्तानात इतिहासाचे एक नवे पान उलगडले जावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

रशिया व या भागातील देश अफगाणिस्तान सरकार व तालिबान (रशियात बंदी) यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील असे सांगून ते म्हणाले की, अफगाणिस्तानात शांतता नांदावी असेच या भागातील देश व आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटते. हा देश अमली पदार्थ व्यापार, दहशतवाद यापासून मुक्त झाला पाहिजे. अफगाणिस्तानातील प्रश्नावर राजकीय मार्गाने तोडगा काढण्याची गरज आहे. अफगाणी शांतता मंडळाचे सदस्य व तालिबान चळवळीच्या प्रतिनिधी मंडळांचे आम्ही स्वागत करतो. त्यांची येथील उपस्थिती ही सरकार व तालिबान, लोक व राजकीय वर्तुळातील संबंधित यांच्यात सुसंवादासाठी अनुकूल स्थिती निर्माण करील अशी आशा आहे. अफगाणिस्तानात आता आयसिसने डोके वर काढले असून त्यामुळे धोका खूप वाढला आहे. परदेशी पुरस्कर्त्यांवर या गटाचे सगळे अवलंबून आहे. मध्य आशियात विस्तार करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करून घेण्याचा त्यांचा विचार आहे.

मॉस्कोतील अमेरिकी  दूतावासाचा एक अधिकारी या परिषदेस उपस्थित होता. अफगाणिस्तान, भारत, इराण, चीन व पाकिस्तान तसेच इतर देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताने म्हटले आहे की, मॉस्कोत आयोजित केलेली अफगाण परिषद ही अनौपचारिक होती. भारताचे अफगाणिस्तानातील माजी दूत अमर सिन्हा, भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त टीसीए राघवन यांनी मॉस्कोतील या बैठकीत भारताचे नेतृत्व केले. अफगाणिस्तानवरील चर्चेत तेथील सरकारचा सहभाग असावा व त्यावर त्यांचेच नियंत्रण असावे अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका आहे.