रशियाने करोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
‘लसीच्या सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत’ असे मुराश्कोव पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आठवड्याभरात लसीकरण सुरु होईल. नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या असून कुठेही संशोधनाचा कालावधी कमी केलेला नाही असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.
मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी पहिल्या फेजनंतर सांगितले होते. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 1:25 pm