रशियातील सैबेरियातील एका वीज प्रकल्पातील २० हजार टन डिझेल पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी सैबेरिया प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. ज्या प्रकल्पातून डिझेल वाहून गेलं तो प्रकल्प सैबेरियातील नोर्लिस्क या शहरात आहे. यदरम्यान, डिझेलचा हा प्रवाह रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलं आहे. शहरातील अंबरनया नदीत हे डिझेल वाहून गेलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

सैबेरियातील ज्या प्रकल्पातून डिझेल वाहून गेलं तो नोर्लिस्क निकिलचाच एक भाग आहे. ही कंपनी निकेल आणि पॅलॅडियमचं उत्पादन करते. तसंच जगातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये ही कंपनी गणली जाते. शुक्रवारपासूनच या कंपनीतून डिझेलची गळती सुरू झाली होती. परंतु योग्य वेळी खबरदारी न घेतल्यानं दोन दिवसांमध्ये तब्बल २० हजार टन डिझेल पाण्यात वाहून गेलं. प्रकल्पातील इंधनाच्या टँकचा एक पिलर धसल्यामुळे डिझेलची गळती सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. हा टँक एका बर्फाच्या जमिनीवर बनला होता. परंतु तापमान वाढल्यामुळे तो बर्फ वितळू लागला आणि ही घटना घडला. दरम्यान, कंपनीकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

दरम्यान, इंधनाच्या गळतीमुळे पुढील काही दिवसांमध्ये सैबेरियामध्ये जल आणि मृदा संकट उद्भवण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसच या इंधन गळतीमुळे ३५० चौरस मैलांच्या प्रदेशावर याचा प्रभाव पडला आहे. ते पाण्यातून काढणं खुप कठिण काम आहे. ही नदी पुढे जाऊन सरोवराला मिळते, असंही त्यांनी सांगितलं.