चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या करोनारुपी राक्षसानं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं आहे. विकसनशील देशांसोबत विकसित देशांचीही या विषाणूमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउनसारखा कठोर निर्णय देशांना घ्यावा लागला. आता करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सेल्फ आयसोलेट झाले आहेत. पुतिन यांच्या काही सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुतिन यांनी स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना करोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून असते. त्याचबरोबर त्यांची भेट घेणाऱ्यांनाही क्वारंटाइन केलं जात आहे. क्वारंटाइनचा अवधी पूर्ण केल्याशिवाय राष्ट्रपती पुतिन यांना कुणीही भेटू शकत नाही. मात्र इतकं असूनही त्यांच्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे पुतिन यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.

“खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. ते पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना करोना झालेला नाही. तर पुतिन या ताझिकिस्तानला नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र आता त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते बैठकीत सहभागी होतील”, असं क्रेमलिनने सांगितलं. शुक्रवारी सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांची भेट घेतल्यानंतर पुतिन यांनी डॉक्टरांशी सल्लामसलक केली आणि आयसोलेट होण्याच निर्णय घेतला.

“आयुष्यातील नव्या वळणावर…”; झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा कंपनी सोडण्याचा निर्णय

रशियात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. आतापर्यंत रशियात ७१ लाख ७६ हजार ८५ जणांना करोनाची लागण झाली आहे. मागच्या २४ तासात १७ हजार ८३७ रुग्ण आढळले आहे. तर करोनामुळे आतापर्यंत १ लाख ९४ हजार २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ६४ लाख १८ हजार ३३ जणांना करोनावर मात केली आहे. करोना रुग्णसंख्येत रशिया जगात पाचव्या स्थानावर आहे.