लष्कर-ए-तोयबा आणि ‘जेयूडी’ यासारख्या दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाईची भूमिका न घेणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्याकामी भारताने मांडलेल्या निंदाव्यंजक ठरावास विरोध करून रशियाने भारतास धक्का दिला आहे. ब्रिस्बेन येथे आयोजित दहशतवादविरोधी आर्थिक परिषदेत रशियाने भारताच्या पाकविरोधी ठरावास विरोध दर्शविला.
भारताने अलीकडच्या काळात अमेरिकेसमवेत व्यापक संबंध जुळविल्यामुळेही रशियाने पाकिस्तानसमवेत लष्करी करार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
याआधी, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात रशियाने प्रसंगी आपला नकाराधिकार वापरून काश्मीरप्रकरणी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्याच रशियाने ब्रिस्बेनच्या परिषदेत भारतविरोधी चाल केली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानेही भारताच्या विरोधीच भूमिका मांडली होती. ‘ब्रिक्स’ व ‘एससीओ’ परिषदेच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे सांगण्यात आले. ‘इसिस’च्या धोक्याचीही ‘ब्रिक्स’ परिषदेत दखल घेतली जाणार आहे.
अमरनाथ यात्रेत पाकिस्तानचे अडथळे ?
जम्मू : काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा हाणून पाडण्याचे पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असून, अलीकडेच झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांचा उद्देश सीमेपलीकडून घुसखोरीला पाठबळ देण्याचाच होता, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी केला.
राज्यातील मजबूत सुरक्षाव्यवस्था आणि केंद्र सरकारने घेतलेली कठोर भूमिका यामुळे अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी यात्रांवर हल्ला करण्याचा पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.