सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियानं सहमती दर्शवली आहे. यापूर्वी हे अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते.

२०२४ पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक मिळणार S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देणार आहे, अशी माहिती रशियातील वृत्तपत्र Kommersant नं दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस जर भारताला ही अत्याधुनिक संरक्षण प्रणाली मिळाली तर भारत पुढील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये S-400 देखील सहभागी करू शकेल. शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होऊ शकेल, असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

तत्पूर्वी, रशिया दौर्‍यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक बोरिसोव्ह यांनी भारताला लवकर शस्त्रास्त्र पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. भारत आणि रशिया यांच्यात विशेष सहकार्य आहे आणि भारताबरोबरचा करार जलद पूर्ण होईल असं त्यांनी आश्वासन दिल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.

५ अब्ज डॉलर्समध्ये S-400 डील

“रशियाच्या उपपंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाली. करोनासारख्या संकटाच्या काळातही द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आहेत. मला खात्री आहे की जे करार करण्यात आले आहेत ते यापुढे सुरू ठेवले जाते. इतकेच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये ही कामे अगदी कमी वेळात पूर्ण केली जातील,” असं राजनाथ सिंह म्हणाले होते. २०१८ मध्ये, भारत आणि रशियादरम्यान जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा S-400 साठी ५ अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. पाच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी भारत रशियादरम्यान हा करार झाला.

याव्यतिरिक्त भारत रशियाकडून ३१ फायटर जेटदेखील खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त टी ९० टँकचे महत्त्वपूर्ण भाग पुरवण्याबाबतही रशिया आणि भारतात चर्चा झआली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी डिसेंबर २०२१ पर्यंत भारताला S-400 यंत्रणा पुरवण्यात येणार असल्याचं रशियानं म्हटलं होतं. परंतु फेब्रुवारी महिन्यातच रशियाचे उद्योगमंत्री डेनिस मंतुरोव्ह यांनी भारतासाठी S-400 चे उत्पादन सुरू केली असल्याची घोषणा केली होती. भारत आणि रशियादरम्यान तलवार श्रेणीतील फ्रिगेट, हेलिकॉप्टरसाठीही करार करण्यात आला आहे.