रशियाची स्पुटनिक लस भारतात आयातीच्या मार्गाने मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल, असे ही लस आयात व उत्पादन करण्याचा परवाना मिळालेल्या रेड्डी लॅबोरेटरीज या हैदराबादच्या कंपनीने म्हटले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याकडून ही लस आयात केली जात आहे. सप्टेंबर २०२० मध्ये रेड्डीज व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात स्पुटनिक व्ही लशीच्या चाचण्या करण्याबाबत करार झाला होता.

गमालेया नॅशनल रीसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी  या संस्थेने ही लस तयार केली असून डॉ. रेड्डीज कंपनीने त्यांच्याकडून या लशीच्या १० कोटी मात्रा वितरित करण्याचा  परवाना घेतला आहे. नंतर हे प्रमाण १२.५० कोटी करण्यात आले आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पहिल्या तिमाहीतच या लशीची आयात केली जाणार आहे.