जगातील इतर देशांप्रमाणेच रशियातील स्थिती करोनामुळे चिंताजनक बनत चालली आहे. रशियाच्या संसदेनं देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे अधिकार दिलेले असतानाच रशियाच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या आठवड्यात व्लादिमीर पुतीन यांना करोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात फिरवून माहिती देणाऱ्या डॉक्टरलाच करोनाचा संसर्ग झाला आहे. लक्षणं दिसून आल्यानंतर डॉक्टरची तपासणी करण्यात आली. यात त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या मॉस्कोतील मुख्य रुग्णालयाला मागील आठवड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणीही केली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डेनिस प्रोटेन्को यांनी रुग्णालयातील सुविधांविषयी माहिती दिली. या भेटीवेळी डॉ. डेनिस यांनी मास्क वा इतर कोणताही स्वःसुरक्षा पोशाख घातलेला नव्हता. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसत आहे. यासंदर्भात ‘रॉयटर’नं वृत्त दिलं आहे.
या भेटीच्या एका आठवड्यानंतर डॉ. डेनिस यांना करोनाचं निदान झालं. त्यानंतर डॉ. डेनिस यांनी याची फेसबुकवरून माहिती दिली. ‘मला करोना व्हायरची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण, मला थोडसं बरंही वाटत आहे. माझ्या कार्यालयातच मी स्वतःला विलग करून घेतलं आहे. मला वाटत या महिन्यात जी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली, ती तिचं काम करेल,’ असं डेनिस म्हणाले.

‘पुतीन यांची दररोज करोना चाचणी केली जात आहे आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे,’ असं वृत्त ‘क्रेमलीन’च्या (रशियन सरकारची कार्यकारी परिषद) हवाल्यानं रियानं (रशियातील वृत्तसंस्था) वृत्त दिलं आहे. पुतीन यांना २४ तास विषाणू आणि आजारांपासून सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जात आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

आणीबाणी लागू करण्याचे अधिकार

करोनामुळे रशियातील परिस्थितीही चिंताजनक आहे. करोनाला आळा घालण्यासाठी रशिया लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे. मंगळवारी रशियाच्या कायदेमंडळानं सरकारला देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचेही अधिकार दिले आहेत. विशेष म्हणजे या काळात कायदेभंग करणाऱ्यांना शिक्षा करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात कायद्याचं उल्लंघन केल्यास सात वर्षांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.