भारतासाठी कमी वजनाच्या २०० कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मिती चार टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले. भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे उत्पादन केले जाणार असून त्यात कामोव २२६ टी प्रकारची ६० हेलिकॉप्टर्स भारताला तयार स्वरूपात दिली जातील, याशिवाय दीडशे हेलिकॉप्टर्स भारतात तयार केली जाणार असून त्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा करार २०१५ मध्ये करण्यात आला होता.

आंतर सरकारी कराराच्या अनुसार या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन होणार आहे. यात रशियाकडून तंत्रज्ञान हस्तांतराचे आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती कामोव २२६ टी प्रकल्पाचे संचालक दिमित्री श्वेटस यांनी सांगितले. एकूण चार टप्प्यांत हेलिकॉप्टर्सचे उत्पादन केले जाणार असून त्यांचे भाग व तंत्रज्ञान यांच्या हस्तांतराचा एक टप्पा यात आहे. पहिल्या टप्प्यात जुळणी केलेली हेलिकॉप्टर्स रशिया देणार आहे. नंतर तंत्रज्ञान हस्तांतर व तांत्रिक मदत या टप्प्यांचा समावेश आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व दुरुस्ती केंद्र यांचीही पूर्तता केली जाईल. रशियन व भारतीय सुटय़ा भागांचे प्रमाण किती राहील असे विचारले असता त्यांनी सांगितले की, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतराचे आश्वासन दिले आहे त्याचे पालन केले जाईल. यात देशातील कायद्यानुसार काही अटींचे पालन करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेलिकॉप्टर्स वेळेत भारताला दिली जातील असे आश्वासन कामोव डिझाइन ब्युरोने दिले असून सर्व जबाबदारी पार पाडली जाईल असे स्पष्ट केले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारत व रशिया यांच्यात या कराराला अंतिम रूप देण्यात आले होते त्यात रशियाच्या दोन प्रमुख संरक्षण सामुग्री कंपन्या व भारतातील एचएएल यांचा समावेश आहे.

चिता व चेतकची जागा घेणार

रशियन हेलिकॉप्टर्स, रोसोबोरॉन एक्सपोर्ट व एचएएल या कंपन्या यात सहभागी आहेत. भारत चिता व चेतक हेलिकॉप्टर्सच्या जागी नवीन रशियन हेलिकॉप्टर्स तैनात करणार आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाला गेले असताना कामोव हेलिकॉप्टर्सचा करार करण्यात आला. ही हेलिकॉप्टर्स सध्या हवाई दल व लष्कराला दिली जाणार असून नौदलानेही ती घ्यावीत असे रशियाच्या कंपनीचे म्हणणे आहे.