एक दोन नाही तब्बल ३० वर्षांपूर्वी एका विमान अपघातात रशिया येथील एका वैमानिकाला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र हा वैमानिक जिवंत असून तो अफगाणिस्तानात असल्याची माहिती समोर आली आहे. वॅलरी व्होस्ट्रोटीन असे या वैमानिकाचे नाव आहे. १९८७ मध्ये त्याच्या विमानाला अपघात झाला. हे विमान अफगाणिस्तानाजवळ कोसळले. त्यानंतर व्होस्ट्रोटीन बेपत्ता झाल्याच्या बातम्या आल्या. त्याच्याबाबत बराच काळ शोध घेतला गेला. मात्र तो सापडला नाही त्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले. मात्र हाच वैमानिक जिवंत असल्याची माहिती ३० वर्षांनी समोर आली आहे.
वॅलरी व्होस्ट्रोटीन हा रशिया आणि अमेरिकेच्या एका मोहिमेवर काम करत होता. ही मोहीम युद्धकैद्यांशी संबंधित होती. याचसाठी त्याला एका खास कामासाठी अफगाणिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथेच त्याच्या विमानाचा अपघात झाला आणि तो बेपत्ता झाला त्यानंतर काही वर्षांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.
रशियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार १९७९ ते १९८९ या दहा वर्षांच्या कालावधीत रशियाचे सुमारे १२५ वैमानिक मृत असल्याचे घोषित करण्यात आले होते. या १२५ जणांच्या यादीत वॅलरी व्होस्ट्रोटीनचेही नाव होते. मात्र ३० वर्षांनी तो जिवंत असल्याचे समोर आले आहे. २०१५ मध्ये रशियाच्या सैन्य दलातील सैनिकही अशाच पद्धतीने अफगाणिस्तानात सापडला होता. बख्रेद्दीन खाकामव असे या सैनिकाचे नाव होते. या सैनिकाने त्याच्या मुलाखतीत आपण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. तसेच त्यावेळी काबूल येथील स्थानिकांनी मला मदत केली, रुग्णालयात पोहचवले त्याचमुळे माझे प्राण वाचले. त्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला असेही त्याने स्पष्ट केले. इथल्या लोकांचा स्वभाव मला आवडला, इथली माणसे खरोखरच चांगली आहेत म्हणून अफगाणिस्तानातच राहिलो असेही त्याने स्पष्ट केले. आता या सैनिकाप्रमाणेच ३० वर्षांपूर्वी मृत घोषित करण्यात आलेला वैमानिकही जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्याला रशियात परतायचे आहे अशीही माहिती समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 6:44 pm