पुतिन यांचा ट्रम्प यांना दूरध्वनी

दोन्ही देशातील सध्या असमाधानकारक असलेले संबंध सुधारण्याचे आश्वासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना दिले. पुतिन यांनी ट्रम्प यांना ऐतिहासिक विजयाबाबत शुभेच्छा देण्यासाठी दूरध्वनी केला होता. दोन्ही देशांना असलेले धोके, सामरिक व आर्थिक प्रश्न, रशिया व अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक संबंध यावर त्यांनी चर्चा केली.

पुतिन यांनी बुधवारी ट्रम्प यांना विजयानंतर तासाभरात पहिल्यांदा अभिनंदनाची तार केली होती, दोन्ही नेत्यांची यापूर्वी भेट झालेली नाही किंवा बोलणेही झालेले नाही. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना सांगितले, की रशिया व तेथील जनतेशी अमेरिकेचे चांगले संबंध राहतील. क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प व पुतिन यांनी दोन्ही देशातील असमाधानकारक संबंध सुधारण्याचे मान्य केले आहे, संबंध सुरळीत करण्यासाठी कार्यकारी यंत्रणा प्रत्यक्षात आणण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे.

दोन्ही देशातील संबंध समता, परस्पर सन्मान, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे या तत्त्वावर आधारित असतील. जगाचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. दोन्ही नेत्यांची व्यक्तिगत भेट घडवून आणण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत, असे क्रेमलिनने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

बराक ओबामा यांच्या आठ वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिका-रशिया यांच्यातील संबंध बिघडले आहेत, असे असले तरी उत्तर कोरिया, इराण याबाबतीत दोन्ही देशांनी पूरक भूमिका घेतली पण सीरियाच्या प्रश्नावर त्यांच्यात उघडपणे मतभेद झाले होते. पूर्व युक्रेनमध्ये रशियाचा हस्तक्षेप, एडवर्ड स्नोडेन याला रशियाने दिलेला आश्रय हे मुद्दे वादाचे बनले होते.